Monday , September 21 2026
Breaking News

पदवीधर महिलेने निवडला सेंद्रिय शेतीचा मार्ग

Spread the love

 

लता गिंडे यांचा शेतकऱ्यांना मार्गदर्शनातून सेंद्रिय शेतीचा प्रसार

निपाणी (वार्ता) : पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेकजण नोकरीच्या मागे लागतात. त्यामुळे शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष होत असताना, या पारंपरिक दृष्टिकोनाला फाटा देत गळतगा (ता. निपाणी) येथील लता गिंडे यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून त्यांनी शेतीत वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

लहानपणापासूनच शेतीची आवड असलेल्या गिंडे यांनी कुटुंबाकडून मिळालेला शेतीचा अनुभव आणि शिक्षणातून मिळालेले ज्ञान यांचा योग्य समन्वय साधला. शेती म्हणजे केवळ पारंपरिक पद्धतीने पीक घेणे नसून वैज्ञानिक दृष्टिकोन, योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे ज्ञान यांच्या आधारे शेती केल्यास ती चांगल्या उत्पन्नाचे साधन व फायदेशीर व्यवसाय ठरू शकते, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.

ठिबक सिंचन, सेंद्रिय खते, नैसर्गिक शेती तसेच एकात्मिक शेती पद्धतीला त्यांनी प्राधान्य दिले आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवतानाच दर्जेदार उत्पादन घेण्यावर त्यांचा भर आहे. रासायनिक घटकांचा वापर कमी करून विषमुक्त व आरोग्यदायी अन्न उत्पादनाला त्यांनी महत्त्व दिले आहे. पाण्याची कमतरता आणि शेतीतील विविध अडचणी लक्षात घेऊन ठिबक सिंचनाचा अवलंब केल्याने पाण्याची बचत होत असून पिकांना आवश्यक प्रमाणात पाणी व पोषकद्रव्ये देणे शक्य झाले आहे.

सोशल मीडियातून बाजारपेठेशी संपर्क

केवळ उत्पादन घेणे पुरेसे नसून त्याला योग्य बाजारपेठ व योग्य दर मिळवून देणेही महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन गिंडे यांनी सोशल मीडिया आणि ऑनलाइन बाजारपेठेच्या माध्यमांचा प्रभावी वापर केला आहे. शेतकऱ्यांनी मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी करून ग्राहकांशी थेट संपर्क साधावा, यासाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग करता येतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.

स्वतः उत्पादित केलेल्या कृषी उत्पादनांचा उपयोग केवळ व्यावसायिक उद्देशाने न करता कुटुंबाच्या गरजांसोबतच परिसरातील अनेक कुटुंबांना आरोग्यदायी अन्न उपलब्ध करून देण्यावरही त्यांचा भर आहे. त्यामुळे सेंद्रिय अन्नाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कामही त्या करत आहेत.

भरडधान्यांपासून मूल्यवर्धित उत्पादने

कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते, या विचारातून गिंडे यांनी भरडधान्ये, फळे आदींपासून विविध उत्पादने तयार करण्यावर भर दिला आहे. उत्पादित माल केवळ कच्चा माल म्हणून विकण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून तयार उत्पादन बाजारात आणल्यास अतिरिक्त उत्पन्नाची संधी निर्माण होते. पारंपरिक खाद्यपद्धती आणि भरडधान्यांच्या वापराला प्रोत्साहन देत आरोग्यदायी जीवनशैलीलाही त्या महत्त्व देत आहेत.

——————————————————————

“योग्य नियोजन, वैज्ञानिक पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन विचारांच्या आधारे शेती केली तर ती उत्तम आणि फायदेशीर व्यवसाय ठरू शकते. युवा पिढीने आणि महिलांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.”
– लता गिंडे, गळतगा

About Belgaum Varta

Check Also

पिकांसोबत शेतकऱ्यांची स्वप्नेही करपली!

Spread the love  निपाणी तालुक्यात पावसाची उघडीप; सोयाबीन, ऊस करपल्याने शेतकरी हवालदिल निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *