


निपाणी (वार्ता) : निपाणी येथील दौलतनगर परिसरात जमिनीच्या ले-आऊट आणि मोजमापाच्या वादातून निपाणी टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील (वय ४८) यांच्यावर रिअल इस्टेट व्यावसायिक साहिल दिलीप शहा यांनी जीवघेणा हल्ला केला. या वादात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जोरात आदळल्याने पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेचे काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात असून येथील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याबाबत शेकडो समर्थकांनी पोलीस ठाण्यावर रविवारी (ता.२५) मोर्चा काढून निवेदन दिले.
निकू पाटील हे प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आणि माजी आमदारांचे भाचे असल्याने त्यांच्यावरील हल्ल्याची बातमी समजताच परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांचे शेकडो समर्थक आक्रमक झाले आहेत. कायदा-सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीबद्दल तीव्र संताप व्यक्त करत बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यावर धडक दिली. पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित आरोपीला अटक करण्याची मागणी केली.
निपाणीतील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींना तात्काळ ठेचून काढण्याची मागणी करत, संशयित मुख्य आरोपी साहिल शाह यांना तात्काळ अटक करण्याबाबत नियोजन दिले.
आरोपीला तात्काळ गजाआड न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही समर्थकांनी यावेळी दिला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली आहे. पोलिसांनी मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी सुरेश घाडगे, गजेंद्र पोळ, रमेश भोईटे, संजय कांबळे, कृष्णात कुंभार, संजय सुर्यवंशी, रवींद्र इंगवले, सुभाष शिंदे, तुकाराम सुतार, विजय सुतार, उत्तम मोरे, महादेव मल्लाडे, रणजीत मगदुम, शाम इचलकरंजे, संदीप पाटील, संदीप रावळ, सुनील काटकर, भरत पाटील, दिपक चिमगावे, नेताजी पवार, लोबु पोवार, संदीप इंगवले, आमोल पोवार, पुंडलीक कुंभार, शैलेश मल्लाडे यांच्यासह दौलतराव फोंडेशन मित्र परीवार, निकु पाटील फ्रेंड सर्कल पावले मळा, काटकर मळा, मल्लाडे मळा, पवार मळा येथील कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta