



सहकाररत्न उत्तम पाटील यांची बैठक; शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार
निपाणी (वार्ता) : कष्ट करणाऱ्यांच्या जमिनीवर गदा येत असेल, तर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनीचा एक इंचही देऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका सहकाररत्न उत्तम पाटील यांनी येथे आयोजित बैठकीत मांडली.
रिंगरोडच्या प्रस्तावामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तम पाटील यांनी शेतकऱ्यांना पाठींबा दर्शविला. शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. त्यावर अनेक कुटुंबांचे भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचेल, असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.
उत्तम पाटील म्हणाले, रिंगरोडसारखे विकासाचे प्रकल्प राबविताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. विकासाला विरोध करण्याचा प्रश्न नसून विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये. सुमारे ५०० ते ६०० एकर जमिनीवर रिंगरोडचे अतिक्रमण होणार आहे. बोरगावसह अनेक गावांमधून हा रिंग रोड जाणार आहे सुमारे १०० फूट रोडचा प्रस्ताव आहे.
सरकारने सर्वसामान्य व लहान शेतकऱ्यांचा विचार करावा. रस्ते मोठे करण्यापेक्षा आहेत त्या रस्त्यांचे डांबरीकरण करावे. शेतकयांच्या भावना, त्यांच्या जमिनीचे महत्त्व आणि त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याचा विचार करावा. त्यामुळे या प्रकरणात शेतकऱ्यांना एकटे पडू दिले जाणार नसल्याचे सांगितले.
बैठकीस नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक अभयकुमार मगदूम, तुळशीदास वसवाडे, जावेद मकानदार माणिक कुंभार, संजय पवार, फारूख मुजावर, भैय्या अफराज, अजित सवाडे, तात्यासाहेब बसन्नावर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta