



निपाणी (वार्ता) : यंदाच्या गळीत हंगामातील उसाला कारखानदारांनी प्रतिटन ३५०० रुपये, तर राज्य सरकारने १ हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून राज्यभर आंदोलन सुरू आहे.

कारखानदारांनी प्रतिटन ३५०० रुपये दर देण्याची तयारी दर्शविल्याने ही मागणी मान्य करण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली निपाणी शहरातून पदयात्रा काढली. तसेच शहरातील व्यापारी व व्यावसायिकांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील व्यापारी पेठा, सराफ दुकाने, बँका आणि विविध व्यावसायिकांची आस्थापने बंद राहिली.
धर्मवीर संभाजीराजे चौकातून पदयात्रेला सुरुवात झाली. साखरवाडी, जुना पी. बी. रोड, बेळगाव नाका, चाटे मार्केट, गुरुवार पेठ आणि दलाल पेठ मार्गे पदयात्रा पुन्हा चौकात पोहोचली. यावेळी झालेल्या कोपरा सभेत बोलताना राजू पोवार यांनी, ऊसाला योग्य दर मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.
या पदयात्रेत सुखदेव मगदूम, प्रकाश आंबी, मारुती चौगुले, संजय जोमा, मधुकर पाटील, अक्षय पाटील, देवराज भोजे, विनय पाटील, बाळकृष्ण शिंदे, महादेव केसरकर, सुदर्शन शिंदे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta