Friday , November 6 2026
Breaking News

योग्य दर नाही तर ऊसही नाही

Spread the love

 

 

बोरगाव सर्कलवर ४ तास आंदोलन; असंख्य शेतकऱ्यांचा मोर्चात सहभाग

निपाणी (वार्ता) : ऊसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला बोरगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी उद्योगधंदे बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. हजारो शेतकऱ्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढत बोरगाव सर्कल येथे तब्बल ४ तास साखळी आंदोलन करत वाहतूक रोखून धरली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाला पाठिंबा देताना केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. उसाची एमएसपी, इथेनॉलचे दर, साखरेचे दर आणि एफआरपीमध्ये वाढ केल्यास कारखानदारांना शेतकऱ्यांना योग्य दर देणे शक्य होईल. सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. रास्त दर मिळेपर्यंत ऊसतोड करू देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

सुनील नांगरे-पाटील यांनीही सरकारने ऊस दर निश्चित केल्याशिवाय ऊसाचे कांडही तोडू देणार नसल्याचा इशारा दिला. सहकाररत्न उत्तम पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. ऊसाला योग्य दर मिळाल्याशिवाय शांत बसणार नसल्याची भूमिका मांडली. त्याशिवाय आपल्या कारखान्यातर्फे उसाला जास्तीत जास्त दर देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी तात्यासाहेब बसनावर, अण्णासाहेब हवले, रमेश मालगावे, राजू खिचडे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिली. पोलीस प्रशासनाच्या नियोजनामुळे आंदोलन शांततेत पार पडले.
याप्रसंगी बोरगाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब बसन्नावर, शेतकरी अण्णासाहेब हवले, रमेश मालगावे पाटील, शितल सोबाणे, राहुल घाटगे, बाहुबली हवले, नैनेश पाटील, अभय मगदूम, प्रदीप माळी, भाऊसाहेब पाटील, बाळासाहेब बसन्नावर, यांच्यासह बोरगाववाडी, जनवाड, चांद शिरदवाड, कारदगा, ढोणेवाडी, कसनाळ, मानकापूर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *