



बाजारपेठेत नवचैतन्य ; कपडे, आकाश कंदील, सोने खरेदीसाठी गर्दी
निपाणी (वार्ता) : दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठेत खरेदीचा उत्साह शिगेला पोचला आहे. शिवाय बाजारपेठे नवचैतन्य पसरले आहे. प्रमुख बाजारपेठा नागरिकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कपडे, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने, दागिने, मिठाई, फराळाचे साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे.
नवनवीन प्रकारचे कपडे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसत आहे. तरुणाईकडून फॅशनेबल कपडे आणि आकर्षक रंगसंगतीला पसंती दिली जात आहे. सणात घर सजविण्यासाठी आकाश कंदील, आकर्षक विद्युत रोषणाई, पणत्या, रांगोळीचे रंग आणि विविध सजावटीच्या साहित्याची खरेदीही होत आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या चांदीच्या वस्तू, पूजेचे साहित्य तसेच मिठाई आणि फराळाच्या पदार्थांच्यादुकानांतही ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून विविध सवलती आणि आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. दरम्यान, दिवसभर बाजारपेठेत वाहनासह नागरिकांची वर्दळ दिसत आहे. अशोक नगर, कोठीवाले कॉर्नर, बेळगाव नाका, चाटे मार्केट, नरवीर तानाजी चौक परिसरात किरकोळ विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
——————————————————————–
‘दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्राहकांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सोमवारपासून बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. कपडे, दागिने, किराणा आणि पूजेच्या साहित्याला विशेष मागणी आहे. यंदा समाधानकारक उलाढाल अपेक्षित आहे.’
-रवींद्र शेट्टी, सराफ व्यवसायिक,निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta